fastag-annual-pass-2025-toll-free-travel ;देशातील वाहनधारकांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे ! केंद्र शासनाने आता फास्टॅग वार्षिक पास सुरू केला आहे, ज्यामुळे आता देशातील लोकांना फक्त ३,००० रुपयांत वर्षभर राष्ट्रीय महामार्गांवर टोल फ्री प्रवास करता येणार आहे . जर तुम्ही हा पास खरेदी केला तर तुम्हाला वारंवार टोल भरण्याची आवश्यकता राहणार नाही . व तुमचा प्रवासही स्वस्त होईल . पण हा पास देशातील सर्वच महामार्गावर लागू होतो असे नाही . तर कोणत्या महामार्गावर हा पास लागू होतो , व कोणत्या महामार्गावर लागू होत नाही याची सविस्तर माहिती पाहू .ही योजना १५ ऑगस्ट २०२५ पासून सुरू झाली आहे, आणि पहिल्या चारच दिवसांत ५ लाखांहून अधिक लोकांनी हा पास घेतला आहे.
ही पास योजना सुरू करण्यामागे शासनाच्या मुख्य उद्देश म्हणजे टोल भरण्याची प्रक्रिया सोपी करणं आणि वारंवार रिचार्जची गरज कमी करणं.फास्टॅग वार्षिक पास हा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) आणि केंद्र सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या टोल प्लाझावर लागू आहे. यामुळे आता तुम्ही एकदा तीन हजार रुपये देऊन एका वर्षात किंवा जास्तीत जास्त २०० टोल क्रॉसिंगसाठी टोल-फ्री प्रवास करू शकता. जर तुम्ही रोज लांबच्या प्रवासासाठी जात असाल , किंवा टोल क्रॉस करत असाल तर हा पास तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे . उदाहरणच द्यायचं, तर साधारण एका टोल प्लाझावर ५० रुपये लागतात, म्हणजे २०० प्रवासात तुम्ही १०,००० रुपये वाचवू शकता. पण, हा पास फक्त खासगी, गैर-व्यावसायिक वाहनांसाठी आहे, जसं की कार, जीप, किंवा व्हॅन.
हा पास मिळवण्यासाठी तुम्ही राजमार्ग यात्रा नावाच्या ॲपवर जाऊन रजिस्ट्रेशन करून मिळवू शकता , किंवा NHAI च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ३,००० रुपये भरून हा पास घेऊ शकता. यासाठी तुम्हाला तुमचा वाहन नोंदणी क्रमांक (VRN) आणि फास्टॅग आयडी द्यावा लागेल. पेमेंट यूपीआय, डेबिट/क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंगद्वारे करू शकता. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दोन तासानंतर तुमचा पास ऍक्टिव्ह होईल व तुम्हाला एसएमएस द्वारे कळवले जाईल .जर यामध्ये तुम्हाला काही अडचणी येत असतील तर तुम्ही NHAI च्या हेल्पलाइन नंबर वर संपर्क साधा .
आता महत्त्वाचा मुद्दा. हा फास्टॅग वार्षिक पास फक्त NHAI आणि केंद्र सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग आणि एक्सप्रेसवेवर लागू आहे. उदाहरणार्थ, नॅशनल हायवे १९ (दिल्ली-कोलकाता), NH ४८ (उत्तर-दक्षिण कॉरिडॉर), NH ४४ (श्रीनगर-कन्याकुमारी), दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवे, आणि अहमदाबाद-वडोदरा एक्सप्रेसवेवर हा पास चालेल. पण, राज्य सरकारांच्या अंतर्गत येणारे महामार्ग आणि स्थानिक टोल प्लाझावर हा पास लागू होत नाही. यामुळे तुम्हाला तिथे नियमित फास्टॅग खात्यातून टोल भरावा लागेल. महाराष्ट्रात काही महत्त्वाचे महामार्ग यामधून वगळले गेले आहे , त्यामुळे हा पास वापरण्याआधी संबंधित महामार्ग वर तो लागू आहे का नाही याची तपासणी आवश्य करून घ्या .
महाराष्ट्रात मुंबई-पुणे एक्सप्रेसवे, समृद्धी महामार्ग (मुंबई-नागपूर), आणि अटल सेतू यासारख्या मार्गांवर हा पास चालणार नाही. हे मार्ग महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) किंवा इतर राज्य प्राधिकरणांद्वारे व्यवस्थापित केले जातात. म्हणजे, या मार्गांवर तुम्हाला नेहमीप्रमाणे टोल भरावा लागेल, जरी तुमच्याकडे वार्षिक पास असेल तरी. यामुळे थोडा गोंधळ होऊ शकतो, पण NHAI ने यादी जाहीर केली आहे, ज्यात १,१५९ टोल प्लाझा आहेत जिथे हा पास चालतो. यात पुणे जिल्ह्यातील खेड शिवापूर, पाटस, सरदेवाडी, आणि चालकवाडी यासारखे टोल प्लाझा समाविष्ट आहेत.
ही पास योजना फक्त गैरव्यवसायिक वाहनांसाठी आहे , आणि हा पास तुमच्या फास्टॅगशी जोडला जातो. जर तुम्ही व्यावसायिक वाहन, टॅक्सी, किंवा फक्त चेसिस नंबरने नोंदणीकृत वाहन वापरत असाल, तर तुम्ही त्याला पात्र होणार नाही .याशिवाय, हा पास एका वाहनासाठीच आहे आणि दुसऱ्या वाहनात वापरता येत नाही. हा पास काढताना तुम्हाला अडचणी येऊ शकतात .ही योजना खूप फायदेशीर आहे, आणि यामुळे तुमचा प्रवास अधिक सुलभ आणि स्वस्त होईल!